साखरेचे मांडे


Ingredients


१) एक वाटी मैदा ( शीग लावून )
२) पाऊण वाटी तांदळाचे पिठ व साखर यांचे मिश्रण ( या दोघांचे एकमेकांशी प्रमाण, तूमच्या आवडीप्रमाणे अगदी १ टेबलस्पून साखर व बाकीचे पिठ पासून १ टेबलस्पून पिठ बाकिची साखर असे कुठलेही प्रमाण घ्या. ) निम्म्यापेक्षा थोडी कमी साखर घेतली तरी मांडे व्यवस्थित गोड होतात. याशिवाय १ टिस्पून साखर.
३) साजूक तूप
४) कोमट दूध

५) १ टिस्पून खसखस ( ऐच्छीक )
६) वेलची
७) मीठ

त्याशिवाय लाटण्यासाठी पिठी, बटरपेपर वा प्लॅस्टीकचा मोठा कागद, भाजण्यासाठी मोठा तवा लागेल.


Directions

१) मैद्यामधे चिमूटभर मीठ आणि १ टिस्पून साखर घालून, कोमट दूधाने, पुरीला पिठ भिजवतो तितपत घट्ट भिजवून झाकून ठेवा.

२) तांदळाचे पिठ, साखर, वेलचीचे दाणे आणि वापरत असाल तर खसखस हे कोरडेच मिक्सरमधून बारीक करून घ्या आणि ते मैद्याच्या चाळणीने चाळून घ्या.

३) या मिश्रणात थोडे थोडे तूप घालून चमच्याचे ढवळत रहा. एवढेच तूप घालायचे आहे जेणेकरून मिश्रण एकत्र होईल ( साधारण शिर्यासारखे दिसेपर्यंत ) त्यापेक्षा जास्त तूप घालू नका.

Mande Tayaree

४) आता मैदा तिंबायला घ्या. त्यासाठी ओट्यावर एक ताट ठेवून त्यात वरून हा गोळा जोराने फेका. मग थोडासा दूधाचा हात लावून तो गोळा दोन्ही बाजूने ओढा. पहिल्यांदा त्याचे दोन तूकडे होतील. परत परत आपटत व ओढत राहिल्यावर त्याला चांगली तार येईल म्हणजेच त्याचे दोन तूकडे न होता तो ताणला जाईल व एकसंध राहील. थोडा थोडा दूधाचा / तूपाचा हात लावला तरी चालेल. पण हा गोळा पुरणपोळीला भिजवतो तेवढा सैल व्हायला नको. नेहमीच्या चपातीला भिजवतो, तितपतच सैल असू द्या.

५) या मैद्याचा लिंबाएवढा गोळा करून त्याची पारी करा व त्यात साखरेचे मिश्रण दाबून भरून गोळा बंद करा. ६) मंद आचेवर तवा तापत ठेवा. लोखंडी तवा असेल तर तो पालथा ठेवा पण तसा ठेवताना गॅसच्या ज्योतीला पुरेशी हवा मिळतेय याची खात्री करा.

७) ओट्यावर बटरपेपर ठेवून त्यावर पिठी भुरभुरा व वरचा गोळा लाटायला घ्या. हा गोळा अत्यंत पातळ लाटायचा आहे. तसा लाटताना पोळी परत परत उचलण्यापेक्षा, हवा तसा बटर पेपरच फिरवून घ्या.

माझ्याकडे फ्लेक्सीबल चॉपिंग बोर्ड आहे. त्यावरच मी लाटलेय. या बोर्डवर एक ( कोंबडीचे ) चित्र आहे. ते चित्र पुसटसे दिसतेय, एवढी पातळ लाटलीय मी. अर्थात तूम्ही यापेक्षा पातळ लाटू शकता. पण आकार मात्र तव्याच्या आकारापेक्षा मोठा करून चालणार नाही.

Mande Latalela ८) आता पोळी अलगद उचलून तापलेल्या तव्यावर विस्तारून टाका. पालथा तवा असेल तर सगळीकडे पसरेल, चुण्या पडणार नाहीत याची काळजी घ्या. सरळ तव्यात ती मधे घसरणार नाही याची काळजी घ्यावी लागते. सरळ तवा वापरायचा असेल तर शक्य तितका सपाट तवा घ्या. पालथा ठेवायचा असेल तर खोल तवा वा कढई पण चालेल.

९) मांडा भाजायला फार वेळ लागत नाही. दोन्ही बाजूने २०/३० सेकंदातच भाजला जातो. त्याला डाग पडेपर्यंत भाजायचे नसतेच. मांडा तव्यावर असतानाच त्याची पोकळ घडी घाला. तव्यावरून उतरल्यावर तो लगेच कडक होतो, मग त्याची घडी घालता येत नाही. ( भाजताना तेल तूप अजिबात लावायचे नाही. )

Mande Tavyavar

  १०) बाकीचे मांडे पण असेच लाटा व भाजा.

११) व्यवस्थित भाजलेले मांडे खुप टिकतात. घरचे साजूक तूप असेल तर स्वादही छान येतो. मांड्याचा तुकडा तोंडात टाकल्याबरोबर विरघळायला हवा, तरच तो जमला असे म्हणायचे. हा दूधासोबत खातात, नुसताही छान लागतो.

हा पदार्थ करणे यात हौसेचा भाग खुप आहे. अगदी पातळ लाटणे जमले नाही तर थोडे जाड लाटून खरपूस भाजून घ्या व त्याला ( दुसरे काहीतरी ) नाव ठेवा..