खिचू


Ingredients

१) दोन कप तांदूळ
२) एक टीस्पून हिंग
३) एक टीस्पून जिरे
४) एक टेबलस्पून तीळ
५) चवीप्रमाणे मीठ
६) आवडीप्रमाणे शेंगदाणा तेल व लाल तिखट

 


Directions


क्रमवार पाककृती:

नवरात्रीमधे गरबा खेळताना मध्यंतर झाले कि नैरोबीमधे देवळातल्या जेवणात हा प्रकार असायचाच. खिचू हे कदाचित खिचडीचे लाडके नाव असावे. याला पापडी नो लोट पण म्हणतात.
याला तयारी मात्र ३ दिवस आधी करावी लागते. म्हणजे रविवारी सकाळी हा प्रकार करायचा तर गुरुवारी सकाळपासून तयारी करावी लागते. म्हणजे तांदूळ भिजत घालावे लागतात.
तांदूळ घ्यायचे ते बासमती घेण्यापेक्षा दुसरे जाडे, गावठी घेतलेले चांगले. नैरोबीत खिचडीसाठी म्हणून एक वेगळा तांदूळ मिळतो, तोच वापरतात.

तर गुरुवारी सकाळी हे तांदूळ धुवून पाण्यात भिजत घालायचे. शुक्रवारी दुपारी यातले पाणी बदलायचे ( यावेळी तांदूळ धुवायचे नाहीत. ) मग रविवारी सकाळी हे तांदूळ त्यातल्या पाण्यासकटच बारीक वाटायचे. मिश्रण साधारण दूधा एवढे दाट हवे. वाटतानाच त्यात हिंग व मीठ घालायचे. २ कप तांदळाला साधारण पाच कप पाणी हवे.

मग एका मोठ्या भांड्यात जिरे व तीळ भाजून घ्यावे व त्यात हे मिश्रण ओतावे. ( अगदी थोड्या तेलात जिरे व
तीळाची फोडणी केली तरी चालेल ) सतत ढवळत शिजवावे. घट्टसर झाले कि झाकण ठेवून एक वाफ आणावी
खाताना वरून कच्चे शेंगदाणा तेल व भरपूर लाल तिखट घालून खावे. चवीला खुप छान लागतो हा प्रकार.
नैरोबीतल्या एका मित्राच्या बायकोने टिप दिल्याप्रमाणे, जास्त प्रमाणात तांदूळ भिजवून ते तिसर्‍या दिवशी
निथळून सावलीत वाळवायचे. मग कुटून वा मिक्सरवर पिठ करून ठेवायचे. हे पिठ डब्यात भरताना त्यात हिंगाचे खडे टाकायचे. असे पिठ तयार असेल तर हा प्रकार अगदी झटपट म्हणजे १० मिनिटात तयार होतो.
( माझ्याघरी असे पिठ असतेच. ) २ कप पिठाला, ५ कप पाणी घ्यायचे.

मुंबईत मी बघितले नाहीत पण नैरोबीत याचे रेडीमिक्स मिळायचे ( अहमदाबाद हून आलेले असायचे ) पण त्यात
आंबटपणासाठी लिंबूफूल असायचे. त्याने अस्सल चव यायची नाही. नेटवर ज्या कृती आहेत त्यातही तांदळाचे पिठ व सोडा वगैरे वापरायला सांगितले आहे.
हा प्रकार आपल्या तांदळाच्या उकडीसारखा वाटत असला तरी चवीत फरक आहे. शिवाय यात लसूण वगैरे नसते.
पुर्वी आमच्याकडे सालपापड्या करत असत, त्यासाठी असे ३ दिवस तांदूळ भिजवत असत. अनारश्यासाठी पण
असेच तांदूळ भिजवतात. असे भिजवल्याने तांदूळ शिजायला हलके होतात व फुलतातही.

फोटोसाठी म्हणून मी वरून फोडणी दिली आहे. खरे तर वरून फक्त कच्चे शेंगदाणा तेल घेतात. ( मी ऑलिव्ह ऑईल घेतले आहे ) तसेच फोटोत दिसतेय त्यापेक्षा खुपच जास्त लाल तिखट घेतात.

 

khichu 1