Ingredients
लागणारे जिन्नस असे
१) अर्धा किलो आटा
२) १ टेबलस्पून चण्याच्या डाळीचे भरड
३) एक मध्यम बटाटा किंवा ४) कपभर मटाराचे दाणे
५) एक कांदा बारीक चिरून किंवा किसून
६) आले लसणाचे वाटण, १ टेबलस्पून
७) लाल तिखट आवडीप्रमाणे
८) दोन तमालपत्रे
९) २ टिस्पून गरम मसाला ( ताजा केल्यास उत्तम )
१०) तेल, हळद, मीठ
११) कोथिंबीर
Directions
क्रमवार पाककृती:
१) नेहमीप्रमाणे तेल व मीठ घालून आटा सैलसर मळून घ्या.
२) अर्धा तास थांबून तो आटा परत मळा आणि एका मोठ्या वाडग्यात घ्या आणि तो बुडेल एवढे पाणी त्यात घाला.
३) पाण्यात तो आटा कुस्करा.. असे करताना त्यातील स्टार्च हळू हळू पाण्यात विरघळलेल व पाणी दूधाळ होईल. ते पाणी फेकून द्या ( कृपया टिप पहा )
४) राहिलेला आटा दुसर्या पाण्यात कुस्करा.. स्वच्छ पाणी दिसेपर्यंत असे करत रहा ( ४/५ वेळा करावे लागेल. )
५) आता मूळ आकारमानाच्या २५ % ग्लुटेन हातात राहिल. याचे स्वरुप चिवट रबरासारखे असते.
६) आता त्यात मीठ आणि डाळीचे भरड मिसळा ( हे मिसळणे थोडे अवघड जाते, कारण हा गोळा फारच चिवट असतो. )
७) हा गोळा प्रेशर कूकरमधे पाच मिनिटे उकडून घ्या.
८) तो थंड झाल्यावर त्याचे हवे त्या आकाराचे तूकडे करा, आणि तेलात खरपूस परतून घ्या.
९) प्रेशरकूकरमधे तेल तापवून त्यात तमालपत्र व हळदीची फोडणी करा. त्यात कांदा, लाल तिखट, आले लसूण पेस्ट, गरम मसाले वगैरे घालून परता आणि मग २ कप पाणी ओता. त्यात बटाट्याचे तूकडे वा मटार टाका. मीठ टाका आणि वरचे तळलेले तुकडे टाका. प्रेशर आल्यावर ५ मिनिटे शिजवा.
१०) वरून कोथिंबीर शिवरा.
११) भात किंवा चपातीसोबत खा.
या करीतले तूकडे थेट मटणासारखेच लागतात ( मी आता शाकाहारी असलो तरी अगदी लहानपणी सर्व खाल्लेले आहे. चव लक्षात आहे माझ्या. ) इथे मी दिलेली कृती सर्वसाधारण आहे. तूमच्या आवडत्या मटण करीत हे तूकडे वापरू शकतात. अजिबात फरक जाणवणार नाही ( हाडाचाच काय तो फरक )
यात वाया जाणारी कणीक बघून एक विचार सुचला. हे पाणी मी माझ्या सिंकमधे ओतले होते. काही काळाने त्याचा साका खाली बसला. तो साका गव्हाचे सत्व म्हणून वापरता आला असता. हवे तर हे पाणी एखादा दिवस तसेच ठेवून थोडे आंबवताही आले असते.
काही वेळा, या पाण्यापैकीच काही पाणी करीत वापरतात, त्यान करीला दाटपणा येतो.
Bhut ase
LikeLike