Ingredients
लागणारे जिन्नस असे
१) उडदाची डाळ अर्धी वाटी, ५/६ तास भिजवलेली.
२) चणा डाळ, पाव वाटी
३) ३ टिस्पून बडीशेप ( कच्ची )
४) २ टिस्पून मिरीदाणे
५) एक जुडी पालक, फक्त पाने खुडून घेतलेली.
६) एक कप घट्ट दही, फेटून घेतलेले
७) १/२ हिरव्या मिरच्या
८) २ लवंगा
९) १ इंच दालचिनी
१०) एका मसाला वेलचीचे दाणे
११) ३/४ साध्या वेलच्या
१२) ३ टेबलस्पून तूप
१३) मीठ
१४) १ टिस्पून जिरे
१५) अर्धा टिस्पून हळद
१६) १ टिस्पून साखर ( ऐच्छिक )
१७) अर्धा टिस्पून कॉर्नफ्लोअर ( ऐच्छिक )
१८) आवडीप्रमाणे सुका मेवा ( काजू, बदाम, बेदाणे, सुक्या खोबर्याचे तूकडे वगैरे), हा पण ऐच्छिक )
Directions
क्रमवार पाककृती:
१) उडदाची डाळ बारीक वाटून घ्या, व ती ४/५ तास आंबण्यासाठी बाजूला ठेवून द्या. ( रात्रभर ठेवली तर चांगले. )
२) चण्याची डाळ, १ टिस्पून बडीशेप आणि एक टिस्पून मिरीदाणे यांची भरड पूड करा ( कोरडीच )
३) ही पूड व मीठ उडदाच्या डाळीच्या वाटणात मिसळा,
४) थोडा वेळ थांबून याचे सुपारीएवढे गोळे करा व ताटात सुटे सुटे ठेवा.
५) एका मोठ्या भांड्यात थंड पाणी घेऊन त्यात बर्फाचे खडे घालून ठेवा.
६) एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळत ठेवा. त्याला उकळी आली कि एकेक करून त्यात वरचे डाळीचे गोळे सोडा.
७) झार्याने अलगद ढवळा. हे गोळे शिजले कि वर तरंगतील. तसे तरंगले कि झार्याने ताटात काढून घ्या.
८) परत पाण्याला उकळी आणा व त्यात पालकाची पाने टाका. अर्ध्या मिनिटाने पाने चाळणीत निथळून घ्या.
९) लगेच ती बर्फाच्या पाण्यात टाका.
१०) पालक निथळून, हिरव्या मिरचीसोबत बारीक वाटून घ्या.
११) राहिलेली बडीशेप, राहिलेली मिरी, लवंगा, दोन्ही वेलच्या, दालचिनी यांची भरड पुड करून घ्या.
१२) कढईत १ टेबलस्पून तूप टाकून त्यात गोळे घोळवत घोळवत बदामी रंगावर परतून घ्या.
१३) गोळे बाहेर काढा व कढईत्त आणखी १ टेबलस्पून तूप टाका.
१४) ते तापले कि त्यात जिरे टाका. ते तडतडले कि वरची मसाल्याची पूड टाका व परता.
१५) खमंग वास सुटला कि त्यात हळद टाका व थोडे परता.
१६) आता त्यात फेटलेले दही टाका व भराभर परतत रहा. हे परतणे फार महत्वाचे आहे. असे परतले नाही तर दही फाटण्याची शक्यता आहे. तशी शंका असेल तर आधीच दही फेटताना त्यात कॉर्नफ्लोअर मिसळा. तसेच ते फार आंबट असेल तर त्यात साखरही मिसळा ( म्हणून दोन्ही घटक ऐच्छिक ! )
१७) दही फेटता फेटता तूप वेगळे दिसू लागले कि त्यात पालकाचे मिश्रण टाका व थोडे पाणी आणि मीठ टाकून ते उकळू द्या.
१८) मग त्यात वर तळून ठेवलेले गोळे आणि वापरत असाल तर सुका मेवा टाका.
१९) सर्व मिसळून मंद आचेवर ५ मिनिटे उकळा. पाणी फार आटवू नका कारण हे गोळे थोडे पाणी शोषतात.
२०) वाढताना वरून राहिलेले तूप टाका. साध्या भाताबरोबर हा प्रकार खातात. पराठ्यासोबतही छान लागतो.
मूळ कृतीत मी थोडेसे बदल केलेत. या वड्या फक्त उडदाची डाळ वापरूनही करतात. अश्या वाटल्या डाळीत बडीशेप व मिरी घालून मिश्रणाचे मोठे मोठे तूकडे करून थेट उकळत्या पाण्यात घालून शिजवतात ( ते विरघळत नाहीत. ) किंवा डब्यात घालून उकडून, मग त्याचे तूकडे करतात. मग ते भर तेलात तळतात. ( मोहरीच्या ) मला हे भर तेलात तळणे नको होते म्हणून असे गोळे केले. अशा वड्या उत्तरेकडे सुकवलेल्या मिळतात. तशा मिळाल्या तर हा प्रकार खुप सोपा आहे. मेदूवडे किंवा उडदाची भजी करायला घेतली असतील तर त्यातल्या थोड्या पिठाचे गोळे करता येतील. तयार मूगभजी देखील अशी शिजवता येईल.
याला सेपू वडी म्हणतात पण पालक वापरूनच करतात. पालकासोबत हवा तर तर थोडा शेपू घेता येईल.