Ingredients
- १) १ पेला तांदूळ ( बासमती सारखे नको, इतर कुठलेली चालतील )
- २) १ मोठा कांदा
- ३) २ ते ३ टीस्पून लाल तिखट
- ४) अर्धा टीस्पून हिंग
- ५) मीठ
- आणि तळताना तेल.
Directions
१) तांदूळ धुवून पाण्यात भिजत घाला. तांदूळ ३ दिवस भिजवायचे आहेत. पण प्रत्येक दिवशी पाणी बदलायचे.
म्हणजे जर रविवारी सकाळी जर सांडगे करायचे असतील तर गुरुवारी सकाळी तांदूळ भिजत घालायचे.
शुक्रवारी व शनिवारी सकाळी पाणी बदलायचे. म्हणजे तांदळातील पुर्ण पाणी निथळून दुसरे तितकेच पाणी
तांदळात घालायचे. यावेळी तांदूळ धुवायचे नाहीत. ( तांदूळ आंबणे अपेक्षित आहे.)
३) सांडगे करायच्या दिवशी, हे तांदूळ बारीक वाटायचे. त्यात आणखी २ पेले पाणी घालून मिश्रण
शिजायला ठेवायचे. त्यात तिखट, मीठ आणि हिंग घालायचा.
४) सतत ढवळत हे मिश्रण शिजू द्यायचे आणि शिजले कि झाकण ठेवून एक वाफ आणायची.
५) मग आच बंद करून झाकण बाजूला करायचे. आणि दोन दोन मिनिटानी ढवळत मिश्रण थोडे थंड होऊ
द्यायचे.
( फोटोतले मिश्रण जरा जास्त घट्ट शिजलेले आहे, यापेक्षा सैलसर हवे मिश्रण )
६) दरम्यान कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि थंड झालेल्या मिश्रणात घालायचा. परत एकदा
मिश्रण नीट ढवळून घ्यायचे. ( मिश्रण एवढे थंड हवे कि कांदा घातल्यावर त्याला पाणी सुटता नये कि तो
मऊ पडता नये.)
७) या मिश्रणाचे सांडगे, प्लॅस्टीकच्या कागदावर घालायचे ( हे मिश्रण नुसतेही खायला खुप छान लागते )
सांडगे घालताना जरा मोठेच घालायचे, सुकल्यावर ते आक्रसतात ( आणि तळल्यावर परत फुगतात )
८) पहिल्या दिवशी सांडगे वरुन सुकतात, मग ते सोडवून उलटे ठेवायचे. हे सांडगे दुसर्या दिवशी कडकडीत वाळायला
हवेत. पोटात कच्चे राहिले तर आणखी एक दिवस वाळवावेत,
९) आयत्या वेळी भर तेलात तळून घ्यावेत. जेवणावर चांगले लागतात पण चहासोबत जास्त छान लागतात.
हे सांडगे सुकल्यावर आतून पोकळ व्हायला हवेत, तर ते जास्त चांगले फुलतात.